कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना असलेल्या मंदिरांचा जणू खजिनाच. इथली मंदिरं आजही पुरातन अवशेषांच्या पाऊल खुणा जपत श्रद्धा आणि भक्तीची साक्ष देतात. इतकंच नाही तर लोकजीवनाचा सेतू म्हणून जनमानसात आपलं अढळ स्थान राखून आहेत. ‘मंदिर’ या संकल्पनेनं कोकणात जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रुजवला असून माणसांना उत्सवाच्या माध्यमातून जोडल्याने धार्मिक व सांस्कृतिक संचित निर्माण केलं आहे..

श्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे

देवगड-नांदगांव मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावरील जामसंडे गावात 300 वर्षापूर्वीची श्री दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर अशी दोन मंदिरे एकाच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी आहेत. हे जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतांसभोवती नारायण, आदिनाथ गणपती, पावणाई, मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर आहेत. मुख्य मंदिरात दिर्बादेवी विराजमान झालेली आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे स्थान आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या जहाजावरील कुणा व्यापाराने जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती भंजक यवनांपासून मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती गाबीत समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात सापडली .नंतर त्यांना झालेल्या दृष्टांतावरून तिची जामसंडे येथील माळावर मंदिरात स्थापना झाली. यामुळे मच्छीमार बांधवांना ती आपली वाटते. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. ती भटवाडीतील भिडे या माहेरवाशिणीने बांधली आहे. आवारात पाय-यांची विहीर आहे. चार दीपमाळा आहेत. वीरांची स्मारकंअर्थातच वीरगळही मंदिराच्या आवारात आहे.

श्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून कानात मकर कुंडलं, मागे प्रभावळ, उजव्या हातात खड्ग, डाव्या हातात अमृतपात्र अशा शस्त्रांनी, आभूषणांनी दिर्बादेवीची मूर्ती सुसज्ज आहे. मूर्ती नेहमीच जिवंत वाटते. मूर्ती जुन्या काळातील असून, ती दोन फूट उंचीची आहे. मूर्ती द्विभूज असून ती काळ्या पाषाणातून कोरलेली आहे. समस्त देवगड आणि जामसंडे गावाचं रक्षण करते, अशी तिथल्या भक्तांची श्रद्धा आहे.
मंदिराला उंच कळस बसवला आहे. आत मंदिरात जमीन आणि भिंतींवर फरशी, मार्बल टाइल्सचा सुरेख वापर करून केलेलं सुशोभीकरण पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. मंदिराच्या आसपास पूर्वीपासून भग्नमूर्ती दृष्टीस पडतात.
मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाक ठेचलेले आहे. यावरून शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट होते. देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र रामेश्वराची पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या दशावताराचे कोरीव काम अप्रतिम आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील ब-याच देवस्थानात अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत. कान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर मंदिरासमोंर आहे.

देवगडवासीयांचं आणि हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली दिर्बादेवी भक्तांच्या हाकेला, संकटाला, मदतीला उभी राहते, याचा प्रत्यय सर्वानाच आलेला आहे. कुठलंही मंगलकार्य असेल अथवा गावाबाहेर प्रवासाला जायचं असेल तर मंगलभावनेने प्रत्येक जामसंडेकर आणि देवगडकर या देवीसमोर भक्तिभावाने नतमस्तक होतो.

श्री देवी भद्रकाली, रेवंडी, ता. मालवण

मालवणी कलावंत मच्छिंद्र कांबळी यांचे भद्रकाली प्रॉडक्शन ज्या देवीच्या नावाने सुरु झाले तीच ही रेवंडीची भद्रकाली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवस्थानच्या जुन्या जाणत्या व अनुभवी मानक-यांकडून काही माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार मंदिराची स्थापना सुमारे ४०० वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगण्यात येते. येथील रेवंडीच्या कांबळी घराण्यातील मूळ वंशज हे काशीहून आले. ते प्रथम कांदळगावच्या सीमेवरून सध्या असलेल्या कांबळीवाडी येथे वास्तव्यास आले. रेवंडी गावची मध्यवर्ती जागा निवडून तेथे श्री शंकर व पार्वती या उभयता देवतांची काळ्या पाषाणाची लिंगस्वरुपात स्थापना केली. हे अर्धनारी नटेश्वराचे एकरूप स्वरूप आहे. तसेच भद्र म्हणजे शिवशंकर व काली म्हणजेच पार्वती माता असल्यामुळे ही देवता ‘भद्रकाली’ या नावाने प्रसिद्ध झाली.

श्री क्षेत्र स्वयंभू कालिकादेवी मंदिर... हडी, मालवण

मालवण तालुक्यात नदीकिनारी वसलेल्या हडी गावची कालिकादेवी ही ग्रामदेवता आहे. ही देवी स्वयंभू असून ती नवसाला पावते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे येथील आणि या परिसरातील भाविक तिची भक्तिभावाने पूजा करतात. गावात कालिकादेवीचे टुमदार मंदिर असून त्याचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांना एक वेगळाच आनंद मिळतो.
कालिकादेवीची स्वयंभू पाषाणमूर्ती येथील एका शेतक-याला शेत नांगरताना सापडली. मूर्तीला नांगराचा फाळ लागल्याने त्यातून रक्त येत होते, अशी अख्यायिका आहे. विशेष म्हणजे या मूर्तीवर ती खूण अद्याप तशीच आहे. या देवीचे भक्त केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आहेत. गोवा, कर्नाटक या शेजारच्या राज्यांतील भाविकही या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. त्रिपुरारी पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. त्यादिवशी देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात. देवीचे मंदिर पुरातन असून त्याची देखभाल व व्यवस्थापन हडी देवस्थान समितीच्या वतीने केले जाते. मंदिरात दरवर्षी भाविकांची गर्दी वाढतच असल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्याची विनंती काही भाविकांनी केली . त्यामुळे देवस्थान समितीने मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारले आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर...

कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र, अतिप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी… कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर… देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे 11व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. अशा या कुणकेश्वर मंदीराचा ईतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.
कुणकेश्वर मंदिराच्या बाबतीत एक दंतकथा सांगितली जाते ती अशी की,कित्येक वर्षाँपुर्वी एक अरबी व्यापारी समुद्रमार्गे जहाज घेऊन चालला होता. त्यावेळी समुद्रात अचानक वादळ निर्माण झाले. जहाजासकट आता आपणालाही जलसमाधी मिळणार या भितीने तो कासावीस झाला इतक्यात जमिनीच्या दिशेने त्याला एक ज्योत पेटत असलेली दिसली. याठिकाणी देवाचे स्थान असणार अशी मनाची खात्री करुन त्याने त्या देवाकडे प्रार्थना केली की, जर का आपले प्राण वाचविलेस तर याठिकाणी तुझे मंदिर उभारीन आणि आश्चर्य घडले वादळ शांत झाले. आणि तो व्यापारी आपल्या जहाजासहित सुखरुप किनाय्राला पोहोचला मग ज्या ठिकाणी ज्योत दिसली तेथे पाहणी केली असता त्याला हे कणकेच्या राईतील शिवलिंग दिसले. मग बोललेला नवस पुर्ण करण्यासाठी त्याने कुणकेश्वराचे मंदिर बांधले. नंतर त्याने मंदिराच्या कळसावरुन उडी घेतली व आपली जीवनयात्रा संपविली त्या व्यापाय्राची उडी ज्याठिकाणी पडली तेथे त्याची समाधी बांधण्यात आली.

स्वयंभू द्विभूज श्री गणेश, रेडी-वेंगुर्ला

नवसाला पावणारा स्वयंभू द्विभूज श्री गणेश.
रेडी बंदर किनार्‍याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तेथेच झोपला. पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोदा आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला. त्यानुसार श्री.कांबळी व श्री.वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला. श्रीदेवी माऊलीने श्रीगणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा कौल दिला. खोदकाम करता करता दि. १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली.

श्री देव रामेश्वर, कांदळगाव

तोंडवळी-तळाशिल, पासून अवघ्या दहा-बारा कि. मी. अंतरावर असलेल्या कांदळगावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. कांदळगावचे रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो. सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. महाराज व्यथित झाले. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्‍वर त्यांच्या स्वप्नात आले. ”मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर.”

श्री भराडी देवी यात्रा, आंगणेवाडी

श्री भराडीदेवीचं मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मालवणपासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवस चालते.
कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणार्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी, मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला स्वरूप आलं आहे ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखं. अडलेले नडलेले गोरगरीब मोठ्या श्रद्धेने जसे या जत्रेला जातात, तसंच खिशात चार पैसे खुळखुळू लागलेले हवशे-नवशे आंगणेवाडीची जत्रा नेमकी आहे तरी काय या उत्सुकतेपोटीही जातात.

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, आचरा.

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आणि इनामदार श्री देव रामेश्वराच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली भूमी म्हणजे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा. आचरा हे मालवण तालुक्यातील एक गाव. इथे संस्थानकाळापासून पाळल्या जाणा-या रूढी परंपरा संस्थांनी थाटाच्या उत्सवांमुळे आजच्या विज्ञान युगातही सर्वश्रुत आहेत. सण उत्सवात मिळून मिसळून राहणा-या सर्व जाती धर्माच्या लोकांमुळे हे गाव समतेचा आदर्श निर्माण करत आहेत. मंदिर शिवशंभोचेही असूनही उत्सव साजरे होतात ते श्रीविष्णूचे. अशा प्रकारे शैव-वैष्णवांचा मिलाफ आच-यातच अनुभवता येतो. सातार्‍याचे मुत्सद्दी सेनानी छत्रपती शाहू महाराजांनी आच-यातील रामेश्वर देवास १७२० मध्ये संपूर्ण गाव इनाम म्हणून दिलं आणि हे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान नंतर आचरा गाव म्हणून प्रसिद्धीस आलं. या मंदिरातील नित्य नैमित्तिक कार्यक्रमांची मांडणी इतकी पद्धतशीरपणे बनवली आहे की, ती शिवकालापासून ते नंतरच्या पेशवे अंमलात, आंग्ल (इंग्रज) आमदानीत व आजच्या लोकशाहीतही तशीच पद्धतशीरपणे सुरू आहे. मंदिरासंबंधीच्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये व जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मंदिर कसं बांधलं, याचा उल्लेख नसला तरी १६८४ पूर्वीपासूनचे उल्लेखही सापडतात. मंदिरातील प्राचीन शिलालेखावर मंदिराचा कोनशिला समारंभ १६८४ मध्ये सिद्धीस आला, असा उल्लेख आहे. यावरूनच येथील मंदिराची प्राचीनता आणि ऐतिहासिकता स्पष्ट होते.

पाणखोल जुवा बेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे मालवण तालुक्यातील हडी गावातील कालावल खाडीमधील पाणखोल जुवा बेट आहे.
बाजूलाच आणखीन एक बेट – त्याचे नावं बंडया आणि त्याला लागूनच तोंडवळीचा किनाराही दिसतो. मुख्य रस्त्याला लागून एका आडवळणाने अर्धा km गेले कि लांबूनच जुवा बेट दिसते. या बेटावर अगदी मोजकीच ३०-३२ घरे आहेत. बेटावरून कुठेही जायचे म्हटले कि होडीशिवाय पर्याय नाही.
येथे येणा-या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, नीरव शांतता, मोकळेपणा या ठिकाणी अनुभवता यावा, यासाठी ग्रामस्थांकडून येथे विशेष प्रयत्न केले जातात. पर्यटनस्थळाची व्याख्याच या ठिकाणी बदललेली आपणाला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे केवळ भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. येथे येणा-या पर्यटकांना नौकाविहाराबरोबरच मासेमारी करण्याचा, खेकडे पकडण्याचा आनंदही घेता येतो. तसेच मलईदार शहाळी, नाष्टय़ासाठी घावणे आणि रस्सा, व अस्सल मालवणी जेवण आणि राहण्यासाठी झावळ्यांच्या सहाय्याने बनवलेली झोपडी अशा प्रकारच्या विविध सेवा येथे पुरवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळत असल्यामुळे या बेटांवर पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

बैरागी कासारटाका..मालवण

मालवण शहरापासून सुमारे ११ कि. मी. वर असणारे कासारटाका हे धार्मिक ठिकाण. येथे असलेली हिरवीगार वनराई, त्यात खळखळत वाहणारे नदीनाले आणि येथील ओहोळावर वसलेले एक घुमटीवजा मंदिर म्हणजे बैरागी कासारटाका. या बैरागी कासार टाक्याविषयी एक दंतकथा प्रचलित आहे.
शिवपूर्वकाळात येथे वाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. तेव्हा येथील लोक नद्या डोंगरातून वाट काढत पायी चालत व्यापारउदीम करत. त्या काळात कासार जमातीचे लोक महिलांना कंकण भरण्यासाठी गावोगावी हिंडायचेत. असा एक कासार मालवणहून चौके मार्गे आपल्या धामापूर गावात जायचा. पहाटेच्या प्रहरी घराच्या बाहेर पडलेला हा कासार सुर्य माथ्यावर आला की मालवणला पोहोचायचा.

श्री भगवती देवी मंदिर, धामापूर.

कोकणातील धामापूर हे अजुन एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव. सुरूवातीला आपल्याला दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते.
१६ व्या शतकात इ. स. १५३० मध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी श्री भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले. जवळच बत्तीस पायऱ्यांचा देखणा सुंदर घाट बांधला. १९५२ साली तलावावर कायमस्वरुपी बंधारा बांधला. सुमारे ४७५ वर्षाहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री देवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे. गावातील ग्रामस्थ व बंधा-याचे रक्षण ही देवीच करते, अशी भावना आहे.

ऐतिहासिक धामापूर तलाव.

मालवण तालूक्यातील धामापूर हे एक रमणीय ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड पोफळीची दौजत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ठ पर्यटन केंद्र बनले आहे.
या ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर श्रीभगवतीचे प्राचीन देवालय आहे. आतील भगवतीची मुर्ती सुबक आहे. ५ एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे. हा तलाव शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे.

श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते

देवगड-आचरा-मालवण मार्गावरील देवगड पासून 19 कि.मी. आणि मालवणपासून 29 कि.मी. अंतरावर असणा-या नारिंग्रे गावापासून 6 कि.मी. अंतरावर कोटकामते हे गाव आहे. व्यक्तिगत ईनामे व संस्थाने रदद्‌ झाली तरी देवगडातील अदयाप अस्तित्वात असलेल्या देवस्थान ईनामापैकी एक गांव. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणुन इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते” असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उतरयावर असतो. येथे सुमारे 350 वर्षांपूर्वी (शके 1647)” सेना सरखेल कान्होजी आंग्रे” यांनी बांधलेले इतिहासकालीन श्री देवी भगवती चे मंदिर आहे. तशा आशयाच्या शिलालेख या देवालयाच्या भिंतीवर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या गावात पूर्वी एक किल्ला होता. त्यावरूनच या गावाला कोटकामते हे नाव पडले आहे. हा संपूर्ण परिसर आमराईने नटलेला आहे. आता किल्ला नामशेष झाला असून त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. गावात प्रवेश करताना दिसणारा बुरूज आणि थोडीफार तटबंदी एवढेच अवशेष शिल्लक आहेत.
इतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती.

श्री गजबादेवी मंदिर, तांबळडेग - मिठबांव गावचे श्रद्धास्थान

देवगड पासुन सुमारे 30 कि.मी. तर कुणकेश्वर पासुन 15 कि.मी. आणि मिठबांव येथुन 5 कि.मी. अंतरावर तांबळडेग गाव आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन रुपेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मीती केली असावी. समुद्र किनाऱ्याला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता गजबा देवीचे मंदिर आहे.  या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. हे मंदिर पुरातन असले तरी मूळ आद्यस्थानाचा जीर्णोध्दार शालिवाहन शके 1842 रौद्र नाम संवत्सर माघ शुध्द एकादशी शुक्रवार दि.18 फेब्रुवारी 1921 रोजी फाटक-मिराशी या गावकरी मंडळींनी केला. येथे प्रतिवर्षी 18 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा केली जाते.

श्री सिद्धिविनायक मंदिर, देवगड

देवगड तालुक्यातील हे गणपतीचे एक जागृत देवस्थान, येथे गणपतीसह शिवशंकराचे स्वयंभु शिवलींग आहे. देवगड आणी कुणकेश्वर येथून साधारणतः 10 किमी. अंतरावर देवगड मालवण मार्गावर अगदी रस्त्याला लागुनच पोखरबांव हे ठिकाण आहे. अगदी सहज गाडीतून जातानाही या गणपतीचे दर्शन होते. आणि नकळत प्रत्येकाचे हात येथे जुळले जातात. मुळ दाभोळे गावात असलेले हे ठिकाण. अतीशय निसर्गसंपन्न आणि शांत अशा वातावरणात आहे. सभोवताली गर्द आमराई, डोँगरातुन वाहत आलेला बारमाही पाण्याचा प्रवाह आणि गणपती आणि शिवशंभूच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला एक वेगळेच सौँदर्य प्राप्त झाले आहे. तसेच शंकराची पाण्यामध्ये ध्यानस्थ बसलेली मुर्ती, हनुमंताचे शिल्प अशी बरीच शिल्पे पर्यटकांचे आकर्षण ठरतात.

गिर्ये गावचा श्री देव रामेश्वर...देवगड

शेकडो वर्षापूर्वीपासून कोकणभूमीत शिवशंकर या प्रमुख दैवतासोबत देवी पार्वतीचे स्थान सुद्धा अढळ राहिलेले आहे. कोकणभूमीतील देवगड तालुक्यातील गिर्ये गावाजवळचे शिवशंकराचे स्थान म्हणजे श्री देव रामेश्वर. ७ मार्चला होणा-या महाशिवरात्री उत्सवानिमित्त या मंदिराविषयी.
श्री देव रामेश्वर या मूळ मंदिराची स्थापना इ. स.च्या १६व्या शतकात किंवा त्यापूर्वीही झाली असावी. १४व्या शतकात उत्तर भारतात अल्लाउद्दिन खिलजी व महंमद घोरी या धर्मवेडे सत्ताधीशांनी जनसामान्यांचा छळ केला तेव्हा त्याला कंटाळून तिथले हिंदू रजपूत राज्यकर्ते तेथून निघून दक्षिण भारतात व कोकणभूमीत येऊन आपले बस्तान बसवले आणि स्थानिकांना एकसंघ ठेवण्याकरता मंदिराची स्थापना केली, त्यापैकी हे एक असावे असे त्याच्या मांडणी व मंदिरातील कलाकुसरीवरून अनुमान काढता येईल.

ग्रामदेवता श्री देवी भगवती मंदिर

देवगड आणि मालवण या दोन तालुक्यांच्या सीमेवर मुणगे गाव वसले आहे. देवगडपासून 30 किमी. आणि कुणकेश्वरपासून 16 किमी. अंतरावर मुणगे गाव आहे. कोकणातील सर्व वैशिष्टे मुणगे गावात अगदी भरभरुन पाहता येतात. म्हणजे हिरवेगार डोंगर, डोंगरात लपलेली कौलारु घरे, समुद्र किनारा, रानडुक्कर वाघ यांसारखे जंगली पशु, आंबे, रतांबे (कोकम), फणस, काजु, नारळ, पोफळीच्या बागा, करवंदांच्या झाळी, आणि अशा निसर्गरम्य परिसरात दिमाखात उभे असलेले ग्रामदेवतेचे मंदीर अशी एकंदरीत कोकणाला साजेशी सर्व वैशिष्ट्ये या गावात आहेत. प्राचीन काळी या गावात ऋषीमुनीचे वास्तव्य होते म्हणून या गावाला मुनीग्राम असे म्हटले जायचे. कालांतराने मुनीग्रामचे अपभ्रंश होऊन मुणगे असे नाव रुढ झाले. या गावची ग्रामदेवता देवी भगवती हे एक जागृत देवस्थान आहे. देवी भगवतीचा वरदहस्त या गावावर असल्याने हे गाव प्रसिद्धीस आले आहे. अगदी सागरी महामार्गाला लागूनच देवी भगवतीचे प्राचीन कौलारु देवालय आहे.

सिंधुदुर्ग किल्ला

दिनांक २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्‍याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला.
सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ 

श्री. स्वामी ब्रह्मानंद गुहा (ओझर)

मालवणहुन देवगड कुणकेश्वर येथे जाणार्‍या रस्त्याने साधारण ११-१२ किमी अंतरावर आचर्‍याच्या आधी तोंडवली तळाशील येथे जाण्यासाठी फाटा आहे. मालवणहुन तोंडवली-तळाशील अंतर १५ किमी आहे. दाट सुरूच्या बनातुन जाणारी वाट आपल्याला अजुन एका अस्पर्श समुद्रकिनारी घेऊन जाते. त्या आधी ओझर येथे श्री. स्वामी ब्रह्मानंद यांची समाधी गुहा आहे. येथील ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व नितळ पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे..
धबधब्याचा आवाज, तलावांतील माश्यांची चळवळं, गुहेची आर्त गुप्ततां, आसपासच्या वृक्षांच्या पर्णांचा ध्वनी, दगडांतील झर्‍यांमधून झिरपणारे पाणी, शुद्ध वातावरणं हे सर्व मन प्रसन्न करते. ओझरच्या गुहेबाबत एक घटना प्रसिद्धं आहे. आसपासच्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एकदां स्वामी ब्रह्मानंद त्या गुहेंतून आंत गेले असतां थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावरं उमटले. या घटनेवरून पुरातत्वं खात्याने संशोधन देखील केले, परंतू गुहा अर्ध्यावरच बंद झालेली आढळली. हिच असावी त्या गुहेबाबतची गुप्ततां. काही जणांच्या मते हे ठिकाण पांडवकालीन आहे, तर काही जणांच्या मते हे ठिकाण शिवकालीन आहे.
ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ आहे. गुहां, देऊळ, समाधी, तलावं व धबधबा असे सर्वचं एका ठिकाणी सापडल्यासं किती आनंद होतो, हे केवळं भेट देण्यार्‍यासंच कळेलं! म्हणुनच या स्थळास आयुष्या एकदातरी भेट द्यावीच!

(सुवर्ण) गणेश मंदिर, मेढा,मालवण

मालवण शहरापासुन अर्धा किमी अंतरावर असलेलं “जयगणेश मंदिर” हे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. श्रीगणेशभक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळवून द्यावा, जागतिक व्यापार-उद्योगापासुन ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर भारतीयांना जय मिळावा, या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव “जय गणेश” असे ठेवण्यात आले आहे. सभामंडपाच्या गाभार्‍यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर आठ दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्णगणेश सिद्धी-बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात ढाल,तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद, लेखणी असून गणेशाचे पारंपारीक ध्यान मन प्रसन्न करणारे आहे.मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. मकर संक्रांतीच्यावेळी सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात त्यावेळी सोन्याचा गणपती विलक्षण तेजाने झळाळून निघतो यावेळी विशेष गर्दी असते.